Wednesday, 1 January 2014

मुंबई विद्यापीठाचे बुद्धिस्ट स्टडीकडे दुर्लक्ष (लोकसत्ता दि.०१.०१.२०१४)


मुंबई विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडी विभाग बंद केल्यानंतर आता याच विषयाशी संबंधित असलेल्या पाली भाषेतील संशोधनाचाही बोजवारा उडाला आहे. पाली भाषेत एम.फिल करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध तपासण्याची जबाबदारी संस्कृत व वैदिक विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविण्यात आल्याने विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत. या संदर्भात विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी कुलगुरू व प्रकुलगुरूंना पत्र पाठवून पालीच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी केली आहे. 
मुंबई विद्यापीठात गेली अनेक वर्षे बुद्धिस्ट स्टडी विभाग सुरू होता, परंतु पुढे हा विभाग फक्त नावापुरताच राहिला. विद्यापीठाने त्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याची खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गंभीर दखल घेऊन गेल्या वर्षांपासून हा विभागच बंद करून टाकला. विद्यापीठाकडून या विभागाची किती हेळसांड होत होती, याचा एक नमुना आयोगानेच उघडकीस आणला. देशातील सर्व विद्यापीठांमधील बुद्धिस्ट स्टडी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी २ मार्च २०१० ते २८ फेब्रुवारी २०१२ या कालावधीत अनेक वेळा बैठका घेतल्या, परंतु मुंबई विद्यापीठातून बुद्धिस्ट स्टडी विभागाचा एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिला नाही. या एका कारणास्तव विद्यापीठ आयोगाने बुद्धिष्ट स्टडी विभाग आणि त्यासाठी मिळणारे अनुदानही बंद करून टाकले.  
पाली भाषेत एम.फिल करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध तपासण्यासाठी संस्कृत व वैदिक विषयांतील प्राध्यापकांच्या किंवा तज्ज्ञांच्या नेमणुका करून विद्यापीठाची या विषयाबद्दलची अनास्थाही उघडकीस आल्याचे वैराळ यांनी पत्रात म्हटले आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हा भंग असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. विद्यापीठाकडे पालीचे तज्ज्ञ नाहीत अशातला भाग नाही, कारण काही विद्यार्थ्यांचे प्रबंध पाली भाषेच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मग, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीतच हा हलगर्जीपणा का, असा प्रश्न आहे. इतर भाषेच्या तज्ज्ञांकडून निबंध तपासले जात असतील तर आपल्या संशोधनाला न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते आहे.
(लोकसत्ता :दिनांक ०१.०१.२०१४)

No comments:

Post a Comment