Friday, 9 November 2012

सुखी माणसाचा सदरा घातलेला भिक्‍खू

जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्‍न नेहमीच आपण स्वतःला करीत असतो. शास्त्रज्ञांना मात्र याचे उत्तर सापडले असून, काठमांडूतील एका बौद्ध भिक्‍खूला जगातील सर्वांत आनंदी माणसाचा किताब देण्यात आला आहे. मॅथ्यू रिकार्ड असे त्यांचे नाव. रिकार्ड हे स्वतः ही एक शास्त्रज्ञ आहेत. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्याबरोबर संवादक म्हणून ते जगभर भ्रमण करीत असतात. 

रिकार्ड हे फ्रान्सचे नागरिक असून, मॉल्युक्‍यूलर जेनेटिस्ट आहेत. विस्कॉन्सिन विद्यापीठात मेंदूतज्ज्ञ रिचर्ड डेव्हिडसन यांनी ध्यानधारणा करणाऱ्या अनेकांच्या मेंदूची शास्त्रीय चाचणी घेतली. रिकार्ड यांच्या मेंदूला 256 सेन्सर्स लावून केलेल्या चाचणीत त्यांच्या मेंदूतून गॅमा लहरी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे निष्पन्न झाले. या लहरींचा संबंध माणसाच्या जागृतावस्था, अध्ययन, स्मृती आणि लक्ष देण्याच्या क्रियेशी आहे. एवढ्या प्रमाणात गॅमा लहरी बाहेर पडत असल्याचे याआधी कधीही नोंदविण्यात आलेले नाही. या चाचणीत रिकॉर्ड यांच्या मेंदूचा डावा भाग हा उजव्या भागाच्या तुलनेत जास्त क्रियाशील असल्याचे दिसले. 

पाश्‍चात्य जगात रिकार्ड यांची ओळख "बौद्ध धर्माचा चेहरा' अशी आहे. रिकार्ड यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला. त्यांचे वडील ज्यॉं फ्रान्सिस रिवेल हे तत्त्वज्ञ, तर आई यान ली टॉमेलिन या चित्रकार. यामुळे पॅरिसमधील बौद्धिक वर्तुळात ते लहानपणापासून रमले. अनेक चित्रकार, साहित्यिक, संगीतकार यांचा त्यांच्या घरी राबता असे. पॅरिसमधील पाश्‍चर इन्स्टिट्यूटमधून 1972 मध्ये "सेल जेनेटिक्‍स' या विषयात त्यांनी पीएच.डी. मिळविली. शास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात चालणाऱ्या चर्चा आणि वादविवादांमुळे लवकरच त्यांना उबग आला. त्यांनी मग सुटीत बौद्ध धर्म अभ्यासण्यासाठी दार्जिलिंगकडे धाव घेतली. नंतर त्यांनी वडिलांसमवेत "द मॉंक ऍण्ड द फिलॉसॉफर' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने त्यांचे नाव जगभर केले. 

"हॅपीनेस : अ गाईड टू डेव्हलपिंग लाईफ्स मोस्ट इपॉंर्टंट स्किल', "द क्वांटम ऍण्ड द लोट्‌स' आणि "व्हाय मेडिटेट' अशा पुस्तकांतून त्यांनी त्यांचे अनुभव मांडले आहेत. त्यांची पुस्तके वीसहून अधिक भाषांत अनुवादित झालेली आहेत. याचबरोबर ते उत्तम छायाचित्रकार आहेत. शास्त्रज्ञ व बौद्ध विद्वान यांच्या समन्वयातून चालणाऱ्या माईंड ऍण्ड लाइफ इन्स्टिट्यूटचे ते सदस्य आहेत. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल फ्रान्स सरकारने त्यांना "ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार देऊन गौरविले आहे. ( सकाळ.)

No comments:

Post a Comment