Wednesday, 1 August 2012

चला, पॅगोडा पाहायला!

गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, राणीची बाग ही आतापर्यंतची मुंबईत पर्यटकांसाठी आकर्षण असलेली ठिकाणे. गेल्या काही वर्षांत यात भर पडलीय गोराई येथील पॅगोडाची. मुंबईच्या गजबजाटापासून काहीसा दूर, पण मुंबईतच असलेला हा पॅगोडा पाहण्यासाठी दिवसाला दोन ते तीन हजार पर्यटक येतात. त्यात दिवसागणिक वाढच होत आहे. आशियातील सर्वात उंच पगोडा म्हणून याची ख्याती आहे. एकता शहा। दि. १ (दहिसर)
एस्सेल वर्ल्डला जाताना बोटीत बसण्याआधीच दूर असलेला उभट सोनेरी घुमट लक्ष वेधून घेतो. जसजसे या घुमटाच्या दिशेने जातो तसतसे त्याचे कोरीव काम अधिक उठून दिसते. हाच तो दाट झाडांमधून दिसणारा बौद्ध मंदिर पॅगोडा. 
पॅगोडाला जाताना पहिले प्रवेशद्वार लागते ते म्हणजे सांची गेट. याची उंची ६0 फूट आहे. आत प्रवेश करताच दुसरे ७२ फुटी बरिमस गेट लागते. तेथून पुढे आले की डाव्या दिशेला बरिमस सरकारने देणगीदाखल दिलेला एक गौण बेल, ज्याचे वजन १३ टन आहे. त्याला घेऊन चार २0 फुटी धम्मसेवक उभे आहेत. वरती चढताना जे संगमरवर लावले आहे, ते ही बरिमस येथून आणले आहे. भारतीय संगमरवराच्या तुलनेत हे अधिक थंड आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी बरिमस हॉस्टेलचे काम सुरू आहे. मध्यभागी असलेल्या पॅगोडाची उंची व लांबी ३२५ फूट आहे. जेव्हा गौतम बुद्ध साधना करायला बसायचे तेव्हा त्यांची लांबी व उंची एक सामान होती, म्हणून यांचीही लांबी व उंची एकसमान आहे. हे पगोडा बर्मा [मेन्मार्ग] येथे असलेल्या सुडुकोनचे प्रतिबिंब आहे. या घुमटाच्या वरच्या दिशेला पावित्र्याचे प्रतीक असलेला ३ फुटांचा क्रिस्टल आहे. त्यावर ४७0 लहान घंट्या लावल्या आहेत. हवेने वाजणार्‍या या घंट्यांमुळे धम्म सगळीकडे पसरतो, असे मानले जाते. पॅगोडाला लागणारे दगड हे राजस्थान (जोधपूर) येथून देणगीदाखल आले आहेत. हा घुमट केवळ दगडावरती उभारला आहे. कोणत्याही प्रकारचा सिमेंटचा किंवा एकही खांबाचा वापर केलेला नाही. दरवाजासाठी लागणारी लाकडे ही बर्मा येथून आणली आहेत. घुमटाच्या आत प्रवेश केल्यास एक भव्य सभागृह लागते. त्याच्या चोहोबाजूला काच लावली आहे. पर्यटकांना केवळ या दरवाजातूनच प्रवेश दिला जातो. येथेच बसून विपश्यना केली जाते. घुमटाच्या आतील बाजूला एक ६ टनांचे धर्मचक्र आहे. त्यात गौतम बुद्धांच्या सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अस्थी आहेत. त्या श्रीलंका सरकार व बौद्ध सोसायटी ऑफ कोलकाता यांनी दिल्या आहेत. या भव्य हॉलमध्ये एका वेळी ८ ते १0 हजार लोक बसू शकतात आणि त्याच्या मध्यभागातील व्यासपीठावर बसून धर्मगुरू उपदेश करतात. त्यांचे आसन वतरुळाकार फिरत असते. १५ मिनिटांत ते एक फेरी मारते. मागच्या बाजूला शांतीचे प्रतीक असलेला अशोकस्तंभ आहे. 
दक्षिण दिशेच्या एका घुमटात १0८ शून्यागार, म्हणजेच ३ बाय ६ आकाराच्या खोल्या आहेत. येथेच बसून विपश्यना केली जाते. विपश्यना केंद्रात १0 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठीही वेगळे प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या मजल्यावर व्हीडीओ गॅलरी आणि गं्रथालय असून, तेथेच बुद्धांचा जीवनपट उलगडणार्‍या महत्त्वाच्या घटना आणि प्रसंगांची १२२ पेंटिंग्ज आहेत. सत्यनारायण गोयंका यांनी १९९६ साली पॅगोडाची संकल्पना मांडली आणि त्यानंतर २000 पासून पॅगोडाच्या कामाला सुरुवात झाली. गुरुपोर्णिमा, बुद्धपोर्णिमा, शरद पोर्णिमेदरम्यान पर्यटकाची संख्या १८ ते २0 हजार होते.

No comments:

Post a Comment