Pages

Saturday, 27 February 2016

बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू

तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक, अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.
बुध्दाने तत्कालीन परिस्थितिचे सामाजिक अवलोकन करून तर्क व विज्ञानाधारित नव्या  विचारसरणीला जन्म दिला. या नव्या विचारधारेच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यालाच श्रमण म्हटल्या गेले. हे श्रमण सामान्य जनापासुन वेगळे दिसावे म्हणून त्यांना वेगळी वेशभूषा व नियमावली निर्माण करून श्रमण संघाची स्थापना केली. बुद्धाच्या या प्रशिक्षित श्रमणानी तर्क व वैज्ञानिक आधारावर ब्राम्हणी विचारसणीचा विरोध केला. त्यात प्रामुख्याने १.यज्ञ २.वर्णाश्रम व्यवस्था  ३.ईश्वराचे अस्तित्व व ४.प्रवृत्ती मार्गाचा विरोध ह्या मुख्य बाबी होत्या.

बुद्धांनी जी शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्ये स्थापित केली त्यात चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्ग याचा प्रामुख्याने समावेश होतो. मानवी जीवनात सततच्या परिस्थितीत उदभवणाऱ्या दु:खापासून मुक्ती मिळविण्याची जालीम औषधे असे आर्यसत्ये व अष्टांगिक मार्गाचे वर्णन करता येईल. बुद्धाने दु:खाच्या मुळ कारणाचे प्रतिबिंब हे “अविद्ये” मध्ये शोधले आहे. बुद्ध म्हणतात दु:खाचे निर्वाण कोणतेही प्राणीमात्र हे स्वंयतेने करू शकतात. त्यासाठी त्याला ईश्वर वा कर्मकांडाच्या आहारी जायची गरज नाही. “अत्तदीपो भव”  हाच जगण्याचा एक मार्ग आहे.

बुद्धाचे विचारविश्व हे आधुनिक विज्ञानाशी  सुसंगत आहे. आधुनिक विज्ञान बुध्दाच्या सिद्धांताचा प्रतिध्वनी आहे अशी डाक्टर आंबेडकरांची मान्यता आहे. गर्भस्थ भृणाला चेतना नसेल तर त्याचा विकास होवू शकत नाही. बुद्धाने कर्मसिद्धांताला महत्व दिले आहे. म्हणजे करीत असलेल्या चांगल्या कामाची छाप समाजावर पडत असतेच परंतु जी व्यक्ती समाज व मानवहीत विरोधी कर्म करीत असेल तर अशा व्यक्तीला त्याच्या कार्यकाळातच अवहेलनेला सामोरे जावे लागते. “अशा व्यक्तीच्या दुष्कृत्याचे फळ हे त्याच्या मरणोपरांत मिळत असते”  हा सिद्धांत बुद्धाने साफ नाकारला आहे.  बुद्ध विचार हे मानवाला दू:खमुक्त करणारे तर आहेच परंतु त्याचबरोबर मानवी मेंदूला विकसित करणाऱ्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुध्दा आहे. बुद्धत्व म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञानप्राप्ती केलेल्या व्यक्तीला बुद्ध गणल्या जाते. बुद्धत्व हे जाणीवविश्व आहे. म्हणजे प्राण्याच्या शरीरातील आंतरिक ज्ञानेन्द्रीयाच्या हालचालीचे टिपण बघणे व त्याचा कार्यकारणभाव अचूक ओळखणे ही बुद्धत्वाची दृष्टी असते. डाकू अंगुलीमाल, चवताळलेल्या हत्तीला शरण आणणे, घायाळ पक्षी व वरिष्ठ भिक्षुकाचे देवदत्त सोबत जाणे ह्या सबंधित घटकांच्या पुढच्या कार्यकारणभावाची चाहूल  बुद्धाला अगोदरच कळली असावी. म्हणूनच आजच्या भाषेत त्या घटनांना सामोरे जाण्याचा “दबंगपणा” बुद्धाने केला. अलीकडेच न्युटनने प्रतिपादित केलेल्या अदुश्य किरणांचे प्रत्यक्ष रूप शास्त्रज्ञानी आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून बघितले. म्हणजेच न्युटनला प्राप्त झालेल्या  बुद्धत्वाच्या तारेच्या उगमस्थानाचे मूळ २५०० वर्षापूर्वीच्या सिध्दार्थ गौतमाच्या बुद्धत्वामध्ये होते हे वर निर्देशित घटनावरुन सिद्ध होते.   
बुद्धाने आपल्या विचाराचा पाया हा शंका व तर्कावर रचला असून तिचा शेवट शून्यात केला आहे. शंका व शून्य यात बुद्ध तत्वाचे सार आहे. त्यांनी शंकेला धर्माचा आधार बनविला तर शून्याला धर्माची उपलब्धि. म्हणून बुद्ध विचार कळायचा असेल तर तो जीज्ञासेच्या आधारेच कळू शकतो. कोणत्याही गोष्टीला केवळ मानून चालणे हे जमणार नाही तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जावे लागेल. बुद्ध म्हणतात, मी सांगतो म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा, शंका उपस्थित करा. ते समजण्यासाठी वेगवेगळया कसोट्या लावा. त्यानंतर पूर्णपणे उमजल्यानंतरच विश्वास ठेवा. स्वत:ची सद्सदविवेक बुद्धी वापरून स्वीकारलेले कोणतेही तत्वज्ञान वा स्वीकारलेली वस्तू कधीही बाद होणारी नसते
शिष्यांना उद्देशून ते म्हणतात, तुम्हाला कोणीही आश्वासित करू शकणार नाही. इथे तुमचा हात पकडून कोणीही शिकविणार नाही. जे काही करावयाचे आहे ते तुम्हाला स्वत:लाच करायचे आहे. “अत्त दीप भव” म्हणजे स्वत:च स्वत:चा दिवा बनून जगायचे आहे. ते म्हणतात, मी मेल्या नंतर रडायचे नाही. मी कोण आहे तुम्हाला रडवणारा? मी तुम्हाला फक्त दिशा दिली आहे. मी असलो आणि नसलो तरी तुम्हालाच चालायचे आहे. कोणाही समोर न झुकण्याचा, कोणाचाही सहारा न घेण्याचा सल्ला ते देतात, कारण असे आधार माणसाला पंगु बनवीत असतात. बैसाखीया (टेकू) तुमच्या पायाचा सहारा बनतो यात शंकाच नाही परंतु त्यानंतर झालेल्या सवयीमुळे तुम्ही स्वत:च्या पायावर चालण्याचा विचारही करू शकणार नाही. आस्थेला जवळ भटकु देण्याऐवजी सत्यशोधक, वैज्ञानिक दृष्टी, स्वत:ची शोधक वृत्ती आणि आव्हाने स्वीकारण्याचे धाडस करण्याचा ते सल्ला देतात. कारण अशी आव्हाने साहस व शक्ती निर्माण करीत असतात.
सत्य एवढे स्वस्त नसते की ते न शोधता मिळेल? सत्य हे आपल्या आजोबा किंवा वडिलांची संपत्ती नसते की ती परंपरेने मुलांना प्राप्त होत असते. भ्रमजाळे व मायावी अवस्थेला विसरून ते शोधावे लागेल. बुद्ध म्हणतात, तुम्ही एखाद्या ठिकाणी विसावलात, ते तुमचे शेवटचे स्थान नसते. तर तो तुमच्या पुढच्या प्रस्थानासाठीचा शक्तीसंचय असतो. कमजोरी हा आत्मशोधाचा भाग नसतो. निरंतर शोधातून ज्ञान प्राप्त होत असते. सोन्याला अधिक निखरन्यासाठी त्याला उच्च तापमानाच्या कसोटीतून जावे लागते. सत्य जाणण्यासाठी अशाच चक्रातून जावे लागेल. तेव्हा कुठे सत्य सापडेल. मुर्खतापूर्ण मंत्र बडबडण्यातून, हात जोडण्यातून, उपासठेवण्यातून वा देवाच्या मूर्तीला साकडे घालन्यातून सत्याचा शोध लागत नसतो. काही लोक श्रद्धा व आस्थेवर विश्वास ठेवण्याचा आग्रह धरीत असतात. बुद्ध याला पाखंड म्हणतात. त्यासाठी ते एक उदाहरण देतात, नदीच्या काठावर बसलेल्या एका व्यक्तीला तुडूंब भरलेल्या नदीच्या प्रवाहातून दुसऱ्या काठावर जायचे असते. त्याने दुसऱ्या काठावर जाण्यासाठी बोट किंवा इतर साधनाचा वापर करण्यास मनाई करीत तिथेच बसून केवळ मंत्रोपच्चार व यज्ञ करून जाण्याचा आग्रह केल्यास ती व्यक्ती दुसऱ्या काठावर आपोआप जाईल का?. अर्थातच नाही. मग अशी व्यक्ती मुर्ख ठरत नाही काय? त्यापेक्षा तसे करण्याचा सल्ला देणारे पुरोहित व त्यांच्या धर्मशास्त्राना जबाबदार धरले पाहिजे. अशा अंधकारातून बाहेर पाडण्यासाठीच बुद्ध “स्वंयप्रकाशित” होण्याचा विचार देतात.

शंका ही वैज्ञानिक दृष्टीकोन लाभण्याची पहिली पायरी आहे. म्हणून भविष्यात लोकमानस जसजसे वैज्ञानिक होत जाईल. मानवी जीवन तसतसे बुद्धविचाराच्या जवळ जात राहील. कारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून गहन विचार करू लागतील तेव्हा आस्था, अंधश्रद्धा, भविष्य, देवी देवता यांना ते आपल्या मनाच्या कप्प्यात थारा देणार नाहीत. दुसऱ्यांचे विचार जसेच्या तसे ते स्वीकारणार नाही. पंडे व धर्मशास्त्रे यांचे म्हणणे ग्राह्य धरणार नाही. ते त्यात बदल करण्याची मागणी करतील. लोकामध्ये हिम्मत वाढून ते व्यवस्थेला षंढवत करणाऱ्या विरोधात विद्रोह करतील.
बुद्ध विचारांनी अनेक धर्म व संप्रदाय भयभीत झालेले आहेत. त्यामुळे शास्त्रे लिहनार्यांनी बुद्ध विचारांना नास्तिक ठरविले आहे. नास्तिक काही सांगत असतील तेव्हा त्यांचे ऐकू नका असे म्हटले आहे. याला डरपोकपणा नाही म्हणणार तर काय म्हणार?. याचा अर्थ त्यांचे विचार हे फार  कमजोर आहेत. नास्तिकांचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचा थरकाप होतो. नास्तिक त्यांना चर्चेचे आवाहन करतात. परंतु आस्तिक नेहमी चर्चा करण्यास भीत असतात.

जगामध्ये आज बुद्धाला आदर का प्राप्त होत आहे?. विचारवंत, चिंतक, शास्त्रज्ञ यांच्या आदर सुमारीत बुद्धाला स्थान का प्राप्त होत आहे?. “बुध्दाचे शाश्वत विचार” हेच त्याचे प्रमुख कारण होय. सत्याचा शोध घ्या, शोधून सत्य आढळले तरच माना. एखादी गोष्ट न शोधता मानली तर तुमचे मन तुम्हालाच बेचैन करीत राहील. बुध्दाचे हेच वैज्ञानिक सूत्र अनेकासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. हा २५०० वर्षापूर्वीच्या महान मानसशास्त्रज्ञ व वैज्ञानिकाच्या सापेक्ष विचाराचा विजयच नाही काय?

बापू राऊत 
९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment